वाई / प्रतिनिधी

वाई तालुक्यात ग्रामसेवकांच्या वारंवार होणाऱ्या अॅडजस्टमेंटमागे नेमके प्रशासनिक कारण आहे की वरिष्ठांची भागवाभागवी आणि आर्थिक तडजोडी, असा प्रश्न आता ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. "प्रोटोकॉल" या गोंडस शब्दाआड सुरू असलेल्या बदली आणि अॅडजस्टमेंटच्या खेळामुळे अनेक ग्रामपंचायतींचा कारभार विस्कळीत झाला असून विकासकामे रखडली आहेत.
तालुक्यात काही ग्रामसेवकांना सतत सोयीच्या ठिकाणी नेमणुका मिळत असल्याची चर्चा असून, तर काहींवर दोन-दोन व तीन-तीन ग्रामपंचायतींचा भार टाकला जात आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने "नेमके निकष काय?" असा सवाल उपस्थित होत आहे.


ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजावर याचा विपरीत परिणाम होत असून नागरिकांना दाखले, नोंदी, करसंबंधित कामे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक गावांमध्ये ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासनाचा गाडा रेंगाळत असल्याचे चित्र आहे.


विशेष म्हणजे, रिक्त पदे कायम ठेवून अॅडजस्टमेंटचा खेळ सुरू असल्याने या मागे केवळ प्रशासकीय गरज आहे की अन्य काही हितसंबंध, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वरिष्ठांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना लाभदायक ठिकाणी ठेवण्यासाठी आणि काही आर्थिक तडजोडींमधून हे निर्णय घेतले जात आहेत का, याची चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
ग्रामपंचायतींना पूर्णवेळ ग्रामसेवक उपलब्ध करून देणे, अॅडजस्टमेंटचे निकष जाहीर करणे आणि संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक स्तरावरून होत आहे. अन्यथा "प्रोटोकॉल"च्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार ग्रामीण प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.